expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: May 2020

Sunday, May 24, 2020

Marathi Essay on Autobiography of a parrot in cage

Marathi Essay on पिंजर्‍यातील पोपटाचे आत्मवृत्त





Marathi Essay on पिंजर्‍यातील पोपटाचे आत्मवृत्त

पिंजर्‍यातील पोपटाचे आत्मवृत्त

     मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिच्या घरी एक पोपट आहे. तो पिंजर्‍यात असतो. तो खूप सुंदर आहे. त्याच्याशी खेळायला मी कधी कधी तिच्याकडे जाते.आजही मी नेहमीप्रमाणे तिच्या घरी गेली व त्याला शिट्टी मारुन त्याच्याशी खेळायला सुरुवात केली पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही किंवा माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही. तो खूप रागातच दिसत होता. त्याने पेरु सुद्धा खाल्ला नव्हता. म्हणून मी त्याला विचारले,”तू आज एवढा रागात का दिसत आहेस? तू पेरु का नाही खाल्लास?” असे विचारताच तो बोलू लागला. तो म्हणाला,” तू मला भेटायला येतेस. माझ्याशी खेळतेस. तुला बरे वाटते. पण तू कधी माझा विचार केलास का? तुझ्या मैत्रिणीने मला या पिंजर्‍यात ठेवले आहे. घरातील सर्वांना मी आवडतो. सर्वजण माझी खूप काळजी घेतात. मला स्वच्छ ठेवतात. मला रोज पेरु, मिरची, चण्याची डाळ तसेच बिस्किट, चॉकलेटअसे आवडीचे पदार्थ खायला देतात. इतर पदार्थही मी आवडीने खाल्ले. मी सर्वांचा खूप आभारी आहे.

          पण मी मात्र या पिंजर्‍यातच बंदिस्त आहे. मला उडावेसे वाटते तरी या पिंजर्‍यातच उडतो. कधी कधी या पिंजर्‍यात माझे पंख अडकतात. समोरच्या झाडावर माझे खूप मित्र येतात. ते मला बोलावतात. पण मी कुठेही जाऊ शकत नाही. मलाही माझ्या मित्रांसोबत फिरावेसे वाटते. या आकाशात विहार करावा असे वाटते. सर्वांशी झाडावर बसून गप्पा माराव्याशा वाटतात. पण माझे हे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले आहे.

          तूच मला सांग जर तुम्हाला पाय असून कुणी तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवले तर? तुमच्या स्वातंत्र्यावर कोणी निर्बंध लादले गेले तर विचार कर कसे वाटेल? मलाही माणसांचा खूप त्रास होतो व राग येतो तर कधी कधी स्वत:चाच. मी तुला एक विनंती करतो की तू तुझ्या मैत्रिणीला समजावून सांग व मला या पिंजर्‍यातून मुक्त कर. मी झाडावर बसेन, माझ्या मित्रांबरोबर दिवसभर फिरून येईन, खूप मजा करेन, पण मी रोज संध्याकाळी आल्यावर तुम्हाला भेटायला येईन, तुमच्याशी खेळेन. तुम्ही दिलेला खाऊ खाईन. माझ्या इतर मित्रांनासुद्धा घेऊन येईन. तुम्हाला मी कधीच विसरणार नाही. पण मी तुला जे संगितले आहे ते लक्षात ठेव.” इतके बोलून तो गप्प बसला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. त्याचे ते बोलणे ऐकुन मी ही नि:शब्द झाले. मला खूप वाईट वाटले. पण या पोपटाला स्वतंत्र करण्याचा मी मनाशी निर्धार केला व तिथून निघाले. 

Thursday, May 21, 2020

Marathi Essay on Manvi Jivnat Vinodache Mahattva





मानवी जीवनात विनोदाचे महत्व

        आपण सर्वजण नेहमी आपल्या घरातल्यांशी, शेजार्‍यांशी, मित्रांशी काही न काही तरी बोलत असतो. पण त्यातला एखादा कुणीतरी सहजतेने एखाद वाक्य बोलून जातो की खूप हसायला येते. कधी कधी तर हसू अनावर होते. यालाच आपण विनोद असे म्हणतो व विनोद करणार्‍याला विनोदी माणूस म्हणून संबोधले जाते.   
        पुढे पुढे या विनोदाच्या कलेच व्यवसायात रूपांतर झाले. विनोदाची भाषा शिकायला कुठलच प्रशिक्षण घ्यावं लागत नाही तर ती कला ठराविक माणसांमध्ये   उपजतच असते. यानंतर विनोदी पुस्तके लिहिली गेली. चित्रपट, नाटकांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व असलेले प्रसिद्ध मराठी विनोदी लेखक म्हणजे पु. . देशपांडे.  हे नाटककार, कलावंत तर होतेच पण त्याच्यात तरल कल्पनाशक्ती व भाषेचे कल्पक उपयोग करण्याचे कौशल्य होते. स्वत: गंभीर राहून इतरांना हसवत ठेवणे यात त्यांचा हातखंड होता. टिव्हीवर सुद्धा विनोदाचे खूप कार्यक्रम येतात. त्यातला झी मराठी वरचा चला हवा येऊ द्या  हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम आहे. यातले विनोदवीर नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे इ. विनोदवीरांनी केलेल्या विनोदी अभिनयामुळे रसिक प्रेक्षकांना खूप आनंद मिळतो. थोडावेळ का होईना ते आपली सुखदु:ख विसरून मनापासून खळखळून हसतात.
         अशा या विनोदाचे मानवी जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. काही काही माणसांना जीवनात नैराश्य आलेल असत. काही माणसे दुर्धर आजाराने त्रस्त असतात तर काही परिस्थितीने गांजलेले असतात. त्यांना हे जीवन नकोस वाटत असत. तर काही रोजच्या कामामुळे त्रस्त असतात. ते सतत चिडचिड करत असतात. पण अशातच विनोदाची साथ असेल तर मनावरचा ताण कमी होतो. विनोदी कार्यक्रम, सिनेमा किंवा नाटक पाहिल्यावर ज्यावेळी माणसे मनापासून खळखळून हसतात. त्यावेळी मात्र त्यांच्या मनावरचा थकवा कमी झालेला असतो. आजारी माणसामध्ये किमान ५०% लोक केवळ विनोद ऐकल्यामुळे बरे होतात. हळूहळू त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण होते. अशा प्रकारे विनोदाला मानवी जीवनात खूप महत्वपूर्ण स्थान आहे. कारण मन प्रसन्न असेल तर सर्व आयुष्य सुखकर होते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,”    
        मन करा रे प्रसन्न|     
              सर्व सिद्धीचे कारण|            

Tuesday, May 19, 2020

Marathi Essay on jagtik paryavaran divas


Marathi Essay on jagtik paryavaran divas  .
Marathi Essay on jagtik paryavaran divas








                  जागतिक पर्यावरण दिवस


            पर्यावरणाचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात ठिकठिकाणी झाडे लावण्याचा संकल्प केला जातो. पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांनासुद्धा पर्यावरणाचे महत्व कळावे म्हणून शाळाशाळांमध्ये पर्यावरणाशी संबधित विविध कार्यक्रम राबवले जातात. 

            आपण ज्या शहरात राहतो तिथे आपल्या आजूबाजूला असलेला परिसर म्हणजेच पर्यावरण. या परिसरात असलेले सर्व सजीव, निर्जीव घटक, हवा, पाणी इ. सर्व मिळून पर्यावरण तयार होते. पर्यावरणाचा मुख्य घटक म्हणजे वनसृष्टी. कारण वृक्ष प्रकाशसंश्लेषणाची क्रिया करून स्वत:चे अन्न तयार करतात व प्राणवायू देतात. इतर जीवसृष्टी ही अन्नासाठी वनस्पतिवरच अवलंबून असतात. या निसर्गात मिळणारी सर्व झाडे, वेली, झुडपं हे सर्व खूप उपयुक्त असतात. झाडांमुळे माणसाच्या सर्व मूलभूत गरजा अन्न, वस्त्र , निवारा इ. पूर्ण होतात. झाडे व सर्व प्राणी हे पर्यावणाचे पूरक घटक आहेत. झाडाच्या प्रत्येक अवयवांचा माणसाला उपयोग होतो. तसेच पृथ्वीवर मिळणारी नैसर्गिक संपत्ती म्हणजे इंधने, धातू इ. हे सुद्धा माणसाच्या गरजा भागवतात. पण मानवाने या सगळ्याचा सर्रास वापर करायला सुरुवात केली. लोकसंख्या वाढली. त्यामुळे माणसाच्या गरजा वाढू लागल्या. त्यासाठी त्याने जंगले तोडली. तेथील जमिनीवर कारखाने, इमारती उभारल्या. दळणवळणासाठी रस्ते बांधले. शेतीसाठी जमिनी तयार केल्या. कारखान्यातील रसायनामुळे नदी, नाले व पाणी प्रदूषित झाले. त्यामुळे पाण्यातील जीवसृष्टीची हानी होते. जंगल तोडीमुळे झाडांवर राहणारे पक्षी हे बेघर झालेत. तसेच वन्य पशूना सुद्धा इतर ठिकाणी जावे लागले.कारखान्यातील धूर, वाहनामधल्या इंधनाचा धूर यामुळे हवेचे प्रदूषण वाढले. तसेच कारखान्यातील मोठमोठ्या मशीनींचा आवाज, वाहनांचा आवाज, फटाके, विमाने इ. च्या आवाजाने ध्वनीप्रदूषण वाढले आहे. इतकेच नाही तर अवकाशात उपग्रह सोडण्यात येतात. विज्ञानाने केलेली प्रगती खरच चांगली आहे. शेतीचे उत्पादन कमी वेळेत जास्तीत जास्त घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आले. रासायनिक खतांचा वापर करायला सुरुवात झाली   कळत नकळत या सर्वांचा पर्यावरणावर परिणाम होत गेला. अशा या मानवी कृत्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. पृथ्वीवर उष्णतेचे प्रमाण वाढले. पावसाचे प्रमाण अनियमित झाले. इतकेच काय तर मानवाचे स्वत:चे आयुष्यमान  देखील कमी झाले.  याच साठी सरकारने वन्य पशू पक्षी यांच्या संवर्धंनासाठी राखीव जंगले  ठेवली. जर तुम्हाला पर्यावरण चांगले ठेवायचे असेल तर जास्तीत जास्त वृक्ष लावले पाहिजेत. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाने यावर निर्बंध घालून पशू पक्षी यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. जर आपल्या भावी पिढीला व्यवस्थित ठेवायचे असेल तर पर्यावरणाची काळजी घेण फार गरजेचे आहे.         
            अशारीतीने पर्यावरण ही आपली नैतिक जबाबदारी आहे व त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे असा प्रत्येकाने संकल्प  केला तर खर्‍या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश सफल होईल.  


                                           जागतिक पर्यावरण दिवस

Sunday, May 17, 2020

Marathi Essay on shetakaryache manogat


  Marathi Essay on 
 Autobiographyof  
         Farmar



                             
         शेतकर्‍याचे मनोगत

            जय जवान, जय किसान हे स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचे घोषवाक्य. सीमेवर रक्षण करणारे जवान व अन्नदाता शेतकरी दोन्ही सारखेच अशा या या बळीराजाची व्यथा जाणून घेण्याची मला संधी मिळाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात आईवडिलांसोबत काही कामानिमित्त गावी गेले होते. त्यावेळी आमच्याच गावातील शेतकरी रामभाऊ यांच्याशी बोलता आले. त्यांची स्वत:ची फक्त २ एकर जमीन आहे. ते आमच्या जमिनीत शेती करतात व आम्हाला त्यातला वाटा देतात. शेत आमच्या घराजवळ आहे.
            एकदा दुपारी रामभाऊ काका शेतात एका झाडाखाली आकाशात पाहत असलेले मला दिसले. मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले असता ते म्हणाले ,”मी आकाशात ढग दिसतात का ते पहात होतो. मागच्या आठवड्यात सुरूवातीला मोठा पाऊस आला होता. त्यामुळे सर्वांनी नांगरणी करून पेरणीसुद्धा केली. अस वाटत होत की पाऊस आता असाच येत राहील. पण मी ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवसापासून आज चार दिवस झाले पाऊस आलाच नाही. पेरणी केल्यानंतर जर पाऊस आला तर धान्य चांगल रुजत. पण आज चार दिवस होऊन गेले पण पाऊस मात्र आलेला नाही. पण लख्ख ऊन मात्र आला आहे. त्यामुळे पेरलेले धान्य वरच राहते व पक्षी धान्य टिपायला येतात त्यामुळे शेतात दिवसभर बसून राहावे लागते.”
            ते पुढे म्हणाले,शेतकर्‍याचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस वेळेवर आला तर शेतात चांगले व सकस पीक येते. पण जर पाऊस नसेल तर मात्र आमच जगणच कठीण होते. आताच बघ ना, पेरणी तर झाली पण पाऊस झाला नाही. आता हे बियाण नंतर व्यवस्थित रुजणार नाही व अपेक्षित तेवढे धान्य मिळणार नाही. मग पुन्हा उसणवारी करावी लागते व कुणाकडे तरी मोलमजुरी करून पैसे परत करावे लागतात. सरकारकडून कधी कधी मदत मिळते पण ती अपुरी पडते. शेतीला लागणारा खर्चसुद्धा कधी कधी भरून निघत नाही. ज्यांची मोठी जमीन आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे. ज्यांच्याकडे आधीचे ही धान्य असते त्यांना काही काळजी वाटत नाही. पण माझ्यासारख्या लहान शेतकर्‍याला मात्र खूप त्रास होतो. आमच कुटुंब हे शेतीवरच अवलंबून असत. इतर उदरनिर्वाहाच काहीच वेगळं साधन नाही. शेतीची कापणी झाल्यावर यात मी भाजीपाला करतो व ते तालुक्याला आठवडी बाजारात नेऊन विकतो. पण त्यातही जास्त फायदा मिळत नाही. जर पाऊस एक दोन दिवसात नियमित सुरू झाला तर मात्र हे वर्ष चांगल जाईल नाही तर पुन्हा ओढाताण होईल. अस बोलता बोलता त्यांचे डोळे पाण्याने भरून आले.”
            
            मलाही त्याची ही व्यथा ऐकून खूपच वाईट वाटले. 
     
                             शेतकर्‍याचे मनोगत

Saturday, May 16, 2020

Marathi Essay on Pavsalyatil ek divas

Marathi Essay on One Memorable Day in Rainy season  


Marathi Essay on Pavsalyatil ek divas
Marathi Essay on Pavsalyatil ek divas
                    




पावसाळ्यातील एक दिवस
                                                                          


ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा !

        ग्रीष्म ऋतुतील उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या जीवांना ज्यावेळी आकाशात काळे काळे ढग दिसू लागतात. त्यावेळी मात्र सगळ्यांनाच वरील बालगीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कधी एकदा पाऊस येतो व कधी वातावरणात गारवा होतो असे होऊन जाते. फक्त माणसाचं नाहीत तर इतर प्राणिमात्रसुद्धा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. विशेष म्हणजे शेतकरी राजा तर जमिनीची मशागत करून पेरणीची वाट पाहत असतो आणि ज्यावेळी पाऊस येतो मग काय! सगळ्यांनाच आनंद होतो. असा हा पावसाळा माझ्यासाठी खूप विशेष असतो.

      या वर्षी पावसाळा तसा वेळेवर सुरू झाला. जून महिन्यात सुरूवातीला तसा खूप मोठा पाऊस येत नाही. यावेळी सुद्धा पाऊस १० जूनला आला होता. त्यापूर्वी अधून मधून कधीतरी पावसाच्या सारी येत होत्या. आम्हा मुलांची तर शाळा सुरू होते. त्यामुळे पावसाच्या या आनंदात आमची शाळेचीही तयारी सुरू असते. आमची शाळा १५ जूनला सुरू होणार होती. पण हवामान खात्याने १४, १५ जूनला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. १५ जूनला मी शाळेत जायला निघाले त्यावेळी खूप मोठा पाऊस येईल अस वाटत नव्हत. आभाळ आलेल होत. पण मी शाळेतून परत येईपर्यंत पाऊस येईल असा काही वाटत नव्हतं. कारण पहिल्या दिवशी शाळा लवकर सुटते व पुस्तकांच खूप ओझं ही नसतं. मी शाळेत गेले. पहिला तास संपला. अचानक वातावणात बदल झाला. वारा जोरात वाहू लागला. विजा चमकू लागल्या. ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला. मी खिडकीतून बाहेर पहिले तर बाहेर अंधार दिसत होता व मोठा पाऊस सुरू झाला. खिडकीची तावदाने सोसाट्याच्या वार्‍यामुळे वाजू लागली. आमच्या शाळेच्या मैदानातील वडाच्या झाडाची एक फांदी मोडून पडली. अर्धा एक तास पाऊस सुरूच होता. त्यानंतर पाऊस थोडा कमी झाला. विजा अधून मधून चमकत होत्या. थोड्या वेळाने शाळा सुटली. मला खूप आनंद झाला.

       मी व माझ्या मैत्रिणी घरी जायला निघालो. शाळेच्या गेटवर आल्यानंतर अचानक पुन्हा काळोख झाला व पाऊस सुरू झाला. आमच्याकडे कुणाकडेच छत्री नव्हती किंवा रेनकोट नव्हता. पण आम्हाला पावसात भिजायला मिळणार याचा आनंद झाला. आम्ही पावसात भिजतचं निघालो. खूप मजा वाटत होती. वार्‍याच्या दिशेबरोबर पावसाच्या सरी आमच्या अंगावर कोसळत होत्या. रस्त्यावर पाणी साचले होते. त्या पाण्यात खेळत, हसत हसत आम्ही चाललो होतो. हाताने एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत होतो. भिजून चिंब झाले होतो. विजा चमकत होत्या. ढग गडगडत होते. पण आम्हाला मात्र त्याचे भान नव्हते. खूप मजा येत होती. घरी जाऊच नये असे वाटत होते. पण उशीर झाला तर आई ओरडेल म्हणून आनंदात भिजत भिजत घरी गेलो. मी घरी पोहोचले तेव्हा माझी आई छत्री घेऊन मला आणण्यासाठी निघत होती. मला भिजलेले पाहिल्यावर ती विशेष काही बोलली नाही. तिने मला स्वच्छ हातपाय धुवून कपडे बदलायला संगितले व मला गरम चहा दिला. पण माझ्या मनातला आनंद मात्र कमी होत नव्हता.

       जर मी घरी असते तर आईने मला पावसात भिजायला दिलेच नसते. आज माझी पावसात मनसोक्त भिजायची इच्छा पूर्ण झाली होती.
अगदी नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच या गाण्यातील मोरासारखे.  

Friday, May 15, 2020

Marathi Essay on Corona grasta Rugnache Manogat





           
                                                                                                        
कोरोनाग्रस्त  रुग्णाचे  मनोगत      



मी अनंत काळे. मुंबईला राहतो. मी एका खाजगी कंपनीत लिपिक या पदावर कार्यरत आहे. कोवीड १९ कोरोना विषाणू चीनमध्ये आला आहे असे ऐकून होतो. पण तो एवढ्या झपाट्याने जगभर पसरेल असे मात्र वाटले नव्हते. आपल्या देशात सुद्धा त्याचा शिरकाव कधी झाला हे कळलेसुद्धा नाही. पण तरीसुद्धा कोणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. सर्वजण आपली कामे रोजच्या प्रमाणे करत होते. मीही सुरूवातीला मास्क वापरत नव्हतो. पण ज्यावेळी कोरोना मुंबईत पसरला तेव्हा मी थोडी काळजी घ्यायला सुरुवात केली. पण लगेचच सरकारने ताळेबंदी जाहीर केली. रेल्वे बंद झाल्या. आम्हाला ऑफिसने घरातून काम करायची परवानगी दिली. पण त्यानंतरच ४ ते ५ दिवस गेले असतील. मला सर्दी झाली, खोकला येऊ लागला व अंगात थोडा ताप आल्यासारखा वाटत होत. पण साधी सर्दी असेल असं वाटलं. पण दुसर्‍या दिवशी महानगरपालिकेची माणसं माझ्या घरी आली त्यावेळी कळलं की आमच्या ऑफिसमध्ये चहा आणणार्‍या मुलाला कोरोना झाला होता. मी त्याच्या संपर्कात आलो होतो. म्हणून माझी कोरोना चाचणी केली गेली व ती पॉझिटिव्ह आली. ते कळताच मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे झाले.
           मला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. पण ज्यावेळी ही बातमी सगळीकडे पसरली. त्यावेळी शेजारी व इतर इमारतीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सर्वजण माझ्याकडे लांबूनच बघत होते. मला खूप अपराध्यासारखे वाटत होते. मला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. माझ्यावर उपचार सुरू झाले. पण माझ्या मनात सतत विचार येत होते. माझ्यामुळे माझे कुटुंब व माझ्या संपर्कातील काही जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सुदैवाने ती निगेटिव्ह आल्याचे कळले. मला हायसे वाटले. माझ्यामुळे आमच्या इमारतीला प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले. लोकांना माझ्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे याची मला खंत वाटत होती. इकडे हॉस्पिटलमध्ये माझ्या आजूबाजूला कोविडचेच रुग्ण होते. मी तिथे गेल्यानंतर २ ते ३ दिवसात एक रुग्ण दगावला. मला मनातून भीती वाटू लागली. दोन दिवसांनी माझी दुसरी चाचणीसुद्धा पॉझिटिव्ह आली होती. मला वाईट वाटले. पण मी मनातून खंबीर राहायचे ठरवले. माझी रोगप्रतिकारक शक्ती चांगली होती. त्यामुळे कोरोनावर मी नक्कीच मात करीन याची मला खात्री होती. त्यानंतर मात्र माझ्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. मला आनंद झाला. मी कोरोनामुक्त झालो होतो. आता डॉक्टरांनी मला घरी सोडायचे ठरवले. मला खूप आनंद झाला. मला घरी सोडण्यात आले. घरी जाताना हॉस्पिटलच्या डॉक्टरर्स, नर्स इ. सर्वांना मला आनंदाने निरोप दिला.
       पण घरी जात असताना पुन्हा माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. मी तिथे गेल्यावर इमारतीतील रहिवाशांना मला बघून काय वाटेल? त्यांची प्रतिक्रिया काय असेल? मला घरी जायला देतील की काही दिवस कुठेतरी विलगीकरण कक्षात राहा असे सांगतील. माझे मन साशंक होते. जेव्हा मी गाडीतून उतरले, तेव्हा सुद्धा मनात धाकधूक होती. पण मी उतरताच सर्वांनी माझे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद होता. त्यांचे ते प्रेम पाहून मी सर्वांचे आभार मानले. मी घरातच पुढील काही दिवस विलग राहण्याचे ठरवले. मी घरात गेल्यावर माझ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. हा एक गोष्ट इथे नमूद करतो की डॉक्टर्स, नर्स तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी स्वत:ची पर्वा न करता अहोरात्र सेवा करत आहेत त्यांना मानाचा मुजरा.
         मित्रांनो , कोरोना झाला तर तो बराही होतो हे मी स्वानुभवातून सांगतो. घाबरू नका. स्वत:ची काळजी घ्या. शासनाने दिलेले नियम पाळा. घरी रहा. सुरक्षित रहा. मनाचीही ताकत वाढवा. जर प्रत्येकाने असे ठरवले तर कोरोना आपल्या देशात फार काळ टिकणार नाही.      



Wednesday, May 13, 2020

Marathi Essay on Matrudin


  

In the name of the Father, Mother-in-law and King-child: Parenting ...                            
                                         मातृदिन     
           
                     स्वामी तिन्ही जगाचा
                आईविना भिकारी !!

१० मे जागतिक मातृदिन  जगातील सर्व मातंl बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आईला प्रेमाची भेटवस्तू देण्याचा दिवस. आई कुठलीही असो, कुठल्याही जातिधर्माची असो, देशातली असो वा परदेशातली असो पण प्रत्येक आईचे आपल्या बाळावर तेवढेच प्रेम असते. बाळाला जरा काही झाले तर ती माऊली कळवळते. आपल्या मुलांना जन्म देणारी, त्याच्यावर संस्कार करणारी, त्यांनी मोठे व्हावे म्हणून धडपड करणारी अशी ही आई असते.आजच्या या मातृदिनी माझ्या आईला प्रेमाची भेटवस्तू म्हणून मी तिच्याबद्दल थोडेसे लिहीत आहे.
        माझी आई तशी उच्चशिक्षित नाही पण ती शालेय शिक्षण घेतलेली आहे. जशी ती दिसायला छान आहे  तशीच ती मनानेही सुंदर आहे. आम्ही एकूण तीन भावंड  पण तिने आम्हाला सारखेपणानेच वागवल. कधीही कुणामध्ये फरक केला नाही. ती आमच्यासाठीच नाही तर आमचे इतर नातेवाईक असो वा कुणीही घरी आले तरी तिने सर्वांना आनंदाने व प्रेमाने वागवले . माझ्या वडिलांची व आईची आई या सुद्धा खूपच प्रेमळ होत्या. त्यांचाच हा वारसा ती पुढे चालवत आहे व हा तिचा गुण आमच्यामध्येही आहे.
        माझी आई स्वभावाने प्रेमळ आहे पण तितकीच शिस्तबद्ध व स्वाभिमानी आहे. माझ्या वडिलांच्या तुटपुंज्या पगारात तिने काटकसर करून आम्हाला वाढवले. आम्हाला चांगले शिक्षण दिले. कधी कधी तिला खूप त्रास झाला. कधी कधी आर्थिक चणचण सुद्धा अनुभवली पण तिने या सगळ्या परिस्थितीवर मात करून आम्हाला पुढे आणले. तिने आमच्यासाठी स्वत: ची आवडनिवड जपली नाही. पण माझ्या मुलांनी खूप मोठे व्हावे, वाईट मार्गाने कधी जाऊ नये, चांगले शिक्षण घ्यावे हीच तिची अपेक्षा आहे. पण स्वत:कडे कधी काही नसले तरी  तिच्या चेहर्‍यावर तिने कधीही जाणवू दिले नाही. येणार्‍यांची योग्य ती ऊठाबस केली. कुणाकडे हात पसरले नाही की आपले गार्‍हाणे कधी कोणाला संगितले नाही. तिने आमच्यावर केलेल्या या संस्काराबद्दल मी तिची खूप आभारी आहे. तिने आयुष्यात खूप चढउतार पाहिले. खूप कष्ट केले पण त्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देत तिने प्रत्येक परिस्थितीत मार्ग काढला व पुढे जात राहिली. तिने आपली सासरची व माहेरची माणसे यात कधीच फरक केला नाही. कुणाच्याही प्रसंगात प्रत्येकाला तिच्या कुवतीप्रमाणे मदत केला. शेजारी असो, नातेवाईक असो सर्वांच्या सुखादु:खात सहभागी झाली अशी ही माझी  आई.
       आपल्या मुलांनी एखादे काम केल्यावर त्यांना  कौतुकाने दाद देणारी व चांगल्या कामात प्रोत्साहन देणारी माझी आई. तिच्याबद्दल लिहायला शब्द अपुरेच पडतील. तिच्यामध्येअसलेला एक महत्वाचा गुण म्हणजे ती एक चांगली सुगरण आहे. तिला सर्व प्रकारचे जेवण व इतर पदार्थ खूप छान पदार्थ करता येतात. पण स्वत: खाण्यापेक्षा इतरांना खाऊ घालण्यात तिला फार आनंद वाटतो. सर्वजण तिच्या जेवणाची स्तुती करतात. आता तब्येतीच्या लहान मोठ्या कुरबुरी चालू असतात पण ती कधी आजारी पडलेली किंवा झोपून राहिलेली मला आठवत नाही. अजूनही ती जमेल तेवढे काम उत्साहाने करते अशी माझी आई तिच्याबद्दल लिहिणे म्हणजे अशक्य!
      अशा माझ्या प्रेमळ माऊलीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचबरोबर या जगातील सर्व मातांना मातृ -दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Monday, May 11, 2020

Marathi Essay on Surya Bolu Lagla Tar.....


                                                                                        सूर्य बोलू लागला तर......               



      सहामाही परीक्षा होती. दुसर्‍या दिवशी मराठीचा पहिलाच पेपर होता. दिवसभर मी सर्व अभ्यास केला होता. दुसर्‍या दिवशी ११ वा. पेपर होता. त्यामुळे सकाळी लवकर उठून निबंध, वृत्तांत लेखन, जाहिरात इ. वाचायचे ठरवले. सकाळी लवकर उठायचे असे मनाशी ठरवून मी झोपी गेले. थोड्या वेळाने मला कसलातरी प्रकाश दिसला. मला वाटले सूर्य उगवला पण खरच होते ते . सूर्य उगवला नव्हता तर तो प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा होता. सूर्य माझ्याशी बोलू लागला.
          तुम्ही मला मुख्य तारा म्हणता. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीसाठी मी फार महत्वाचा घटक आहे. माझ्यापुढे पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळते. मी उगवल्यावर सकाळ होते. सर्व प्राणीमात्रांचा दिवस सुरू होतो. सारी सृष्टी जागी होते. पक्षी घरट्यात किलबिल करतात. उजेड झाला की दाणे टिपायला निघून जातात. सर्व माणसे, लहान मुले, विद्यार्थी त्यांची कामे सुरू करतात. तुझ्याप्रमाणेच सर्वजण दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर काय करायचे ते ठरवतात? खरचं तुम्ही माझ्या येण्याची किती आतुरतेने वाट पाहत असता. मला तुमचे फार कौतुक वाटते. पण मी फार महत्वाचा घटक आहे तो वनस्पती –साठी जी या भूतलावर सर्व प्राणिमात्रांना अन्न देते. प्रकाश संश्लेषण क्रियेमधील मी मुख्य घटक आहे. यामुळे वनस्पती जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू देते. सर्व प्राणीमात्र वनस्पतीवरच जगतात.
           तुला तर माहीतच आहे माझे सौरमंडल किती मोठे आहे ते. विज्ञान व भूगोल या विषयात त्याची माहिती तुला शिकवलेली असेल. कधीतरी पृथ्वीवरच्या सर्वांना पहिलं की कधीतरी पृथ्वीवर यावं, सर्वांशी बोलावं असं वाटत असत. पण माझ्याकडे असलेल्या भयंकर उष्णतेमुळे सर्व जीवनसृष्टी जळून भस्म होईल अशी भीती वाटते. म्हणूनच सर्व ग्रह व उपग्रह हे त्यांच्या विशिष्ट कक्षेत माझ्याभोवती फिरत असतात. आता मला जायला हवे कारण माझी उगवण्याची व मावळण्याची वेळ ठरलेली असते. मला सर्व कामे ठरलेल्या वेळेतच करावी लागतात. असे म्हणून सूर्य अदृश झाला.
         मला जाग आली. मी उठली. राहिलेला अभ्यास वाचला. शाळेत गेले. बाईंनी प्रश्न पत्रिका दिली. मी पेपरात पहिले. पहिलाच प्रश्न निबंधाचा होता व विषय होता.
 
 सूर्य बोलू लागला तर............
   
   

Marathi Essay on Phulache Aatmavrutta


                  
                                              
        फुलाचे आत्मवृत्त          

मी सुट्ट
मी 
 मी सुट्टीमध्ये कोकणात माझ्या गावी गेले होते. माझ्या घरच्या समोर आमची फुलांची बाग आहे. गुलाब, मोगरा, जास्वंद, झेंडू इ. फुलांची झाडे आहेत. एकदा सकाळी उठल्यावर मी सहज बागेत फिरायला गेले होते. एक सुंदर लाल रंगाचे गुलाबाचे फूल बघून मला आनंद झाला. मी सहज त्या फुलावरुन हात फिरवला पण त्याचा काटा माझ्या बोटाला टोचला. मी ओरडले. एवढ्यात कुणाचा तरी हसण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी इकडे तिकडे बघितले पण पाहते तर काय ते फुलच मला हसत होते. मला नवल वाटले.

      फूल म्हणाले, “ तुला आश्चर्य वाटले ना! “ माफ कर हं! मीच तुला हसले म्हणून. पण तू माझ्या पाकळ्यावरून जो प्रेमाने हात फिरवलास. मला खूप बरे वाटले. तुला माझ्या मनातलं सांगावेसे वाटले.” ते ऐकून मी बाजूलाच असलेल्या दगडावर बसले. फूल पुढे बोलू लागले, “मला पाहताच तुला फार आकर्षण वाटले. तुमची ही बाग फुलांनी बहरून गेली आहे. आता थोड्या वेळाने तुझे आजोबा येतील त्यावेळी पूजेसाठी आम्हाला तोडून नेतील देवघरात पूजेसाठी वापरतील आम्हाला देवाच्या पायावर वाहतील त्यावेळी आम्हाला खूप अभिमान वाटतो. तुझी आजी मोगर्‍याचा गजरा करून केसात घालते. तेव्हा ती आमच्यातील एक फूल ही केसात घालते. त्यानंतर आम्हाला विक्रीसाठी व्यापारी घेऊन जातात. पण तुम्ही माणसे फुलांचा अगदी योग्य वापर करता. फुलांचे गुच्छ बनवता, समारंभात सजवटीसाठी वापरता. सौन्दर्य साधने , साबण, अत्तर इ. साठी वापर करता. औषधासाठी फुलांचा वापर करता. हार बनवता, गजरे बनवता, लग्न करणार्‍या जोडप्याच्या गळ्यात सुंदर फुलांचे हार घालता. फुलांच्या सुंदर अगरबत्त्या तयार करता. आम्हाला त्यावेळी खूप आनंद होतो.

 पण ज्यावेळी मात्र आम्ही कोमेजतो, आमच्यातील सौन्दर्य कमी होते तेव्हा मात्र तुम्हीच आम्हाला फेकून देता, पायदळी तुडवता. कचर्‍याच्या डब्यात टाकता. देवचं निर्माल्य हे पवित्र मानले जात.  पण तेही कुठे पाण्यात सोडायचे नाही म्हणून काहीजण आम्हाला असेच कचर्‍यात फेकून देता. त्यावेळी मात्र आम्हाला दुख: होते. आम्हाला वाटणारा अभिमान क्षणार्धात गळून जातो.  पण तुम्ही आमची काळजी घेता योग्य वेळी आमची लागवड करता म्हणून आम्ही आकर्षण व निरोगी असतो. याबद्दल मला तुमचे आभार मानायचे वाटतात. पण त्याचबरोबर एक सल्लाही द्यावसा वाटतो की तुम्ही आमचा जरूर वापर करा. पण आम्हाला उकीरड्यासारखे कुठेही फेकू नका. तुम्ही आम्हाला मातीत एक खड्डा करून किंवा एखाद्या कुंडीत माती टाकून त्यात टाका. झाडाच्या मुळाशी टाका. त्यातून खत मिळेल व शेतीसाठी ते तुम्हाला पुन्हा उपयोगी पडेल."
     फुलाची ती करुण कहाणी ऐकून मला खूप वाईट वाटले व मी त्याने 
सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे वागायचे ठरवले व इतरांना ही तसे वागायला
भाग पाडेन असे ठरवून टाकले.  






Sunday, May 10, 2020

Marathi Essay on Pruthavi Bolu Lagali Tar...

       पृथ्वी बोलू लागली तर......



                    Happy Earth Cartoon , Free Transparent Clipart - ClipartKey


२२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन यावर्षी परीक्षा झाल्यानंतर गावी जाऊन वृक्षारोपण करण्याचा मानस होता. परंतु ताळेबंदीमुळे जाता आले नाही. मनाला खूप वाईट वाटले. अशा विचारात असताना माझा कधी डोळा लागला कळलेच नाही आणि काय आश्चर्य! माझ्या समोर प्रत्यक्ष धरतीमाता उभी होती. मी तिला नमस्कार केला. ती खूप खूश दिसत होती. मी तिला नमस्कार केला पण मनात कसलीतरी खंत होती. मी तिला त्याबद्दल विचारले. तेव्हा ती बोलू लागली. .......

     ती म्हणाली, “तुला आज का वाईट वाटले ते मला समजले. पण काळजी करत करू  नकोस. सर्व काही ठीक होईल. तुला माहीत आहे की माझ्या भूतला वर किती सजीव सृष्टी आहे. परंतु त्यात मला मनुष्या बद्दल फार अभिमान आहे. त्याने आपल्या बुद्दीमत्तेच्या  जोरावर खूप प्रगति केली आहे. त्याने आपले आयुष्य सुखदायी व आराम दायी केले परंतु ते करत असताना मात्र त्याने इतर जीवसृष्टीचा, पर्यावरणाचा कधी विचार केला नाही. तू मला विचारत होतीस ना हीच खंत माझ्या मनात आहे. माणसाने आपल्या स्वार्थापोटी मोठेमोठे कारखाने, इमारत, बांध काम करण्यासाठी जंगले उध्वस्त केली. प्रदूषण वाढले. मी सर्व अन्याय सहन केला. पर्यावरणाचा समतोल राखा, प्रदूषण थांबवा, अतिरेक करू नका. वृक्षा रोपण करा, असे वारंवार मी सांगून सुद्धा माणसाने माझे ऐकले नाही.

         पण आता मात्र चीनमध्ये जन्म झालेल्या कोरोना विषाणू ने सर्व मानव जातीला सळो की पळो करून सोडले. सर्व कारभार थांबले. प्राणहानी झाली. सगळे नुकसान झाले. मोठमोठे प्रगत देश हवालदील झाले. आज माणसाने केलेली माणसाची हानी पाहून मला दुख: होत आहे.

        आज उद्योग धंदे बंद झाल्यामुळे प्रदूषण कमी झाले आहे. इतर जीव सृष्टी आनंदात आहे. प्राणवायू चे प्रमाण वाढले आहे. निसर्ग बहरून आला आहे. पण तुम्हाला  मात्र हा आनंद घेता येत नाही. घरात बसून रहावे लागले आहे. प्राणवायू असताना तोंडे बांधून फिरावे लागत आहे. निसर्गाचा आनंद तुम्हाला घेता येत नाही. अशा या निसर्गा कडे पाहून मला खूशी वाटते. पण तुम्हा सर्वां कडे पाहून मला फारच वाईट वाटत आहे. बाळांनो, तुमच्याच चुकीमुळे तुम्हाला भोगावे लागले आहे. परंतु जेव्हा तुम्ही पुन्हा उद्योगधंदे सुरू कराल तेव्हा तुम्ही काळजी घ्या. आता तरी शहाणे व्हा. तुम्ही सर्वांनी आनंदात रहा व इतरांना आनंदात ठेवा. भरपूर प्रगति करा पण निसर्गाचा समतोल ढळू देऊ नका. तुम्ही व तुमच्या भावी पिढीला सुरक्षित ठेवा ही कळकळीची विनंती करते”.

        इतके बोलून धरती माता निघून गेली. मला जाग आली पण धरती मातेचे ते बोल ऐकून माझे अंत:करण भरून आले.


🌲🌲🌲🌲🌲🌲🌲