मातृदिन
स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी !!
१० मे जागतिक
मातृदिन जगातील सर्व मातंl बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आईला
प्रेमाची भेटवस्तू देण्याचा दिवस. आई कुठलीही असो,
कुठल्याही जातिधर्माची असो, देशातली असो वा परदेशातली असो पण
प्रत्येक आईचे आपल्या बाळावर तेवढेच प्रेम असते. बाळाला जरा काही झाले तर ती माऊली
कळवळते. आपल्या मुलांना जन्म देणारी, त्याच्यावर संस्कार करणारी, त्यांनी मोठे व्हावे म्हणून धडपड करणारी अशी ही आई
असते.आजच्या या मातृदिनी माझ्या आईला प्रेमाची भेटवस्तू म्हणून मी तिच्याबद्दल
थोडेसे लिहीत आहे.
माझी आई तशी उच्चशिक्षित नाही पण ती
शालेय शिक्षण घेतलेली आहे. जशी ती दिसायला छान आहे तशीच ती मनानेही सुंदर आहे. आम्ही एकूण तीन
भावंड पण तिने आम्हाला सारखेपणानेच वागवल.
कधीही कुणामध्ये फरक केला नाही. ती आमच्यासाठीच नाही तर आमचे इतर नातेवाईक असो वा कुणीही
घरी आले तरी तिने सर्वांना आनंदाने व प्रेमाने वागवले . माझ्या वडिलांची व आईची आई
या सुद्धा खूपच प्रेमळ होत्या. त्यांचाच हा वारसा ती पुढे चालवत आहे व हा तिचा गुण
आमच्यामध्येही आहे.
माझी आई स्वभावाने प्रेमळ आहे पण तितकीच
शिस्तबद्ध व स्वाभिमानी आहे. माझ्या वडिलांच्या तुटपुंज्या पगारात तिने काटकसर
करून आम्हाला वाढवले. आम्हाला चांगले शिक्षण दिले. कधी कधी तिला खूप त्रास झाला. कधी
कधी आर्थिक चणचण सुद्धा अनुभवली पण तिने या सगळ्या परिस्थितीवर मात करून आम्हाला
पुढे आणले. तिने आमच्यासाठी स्वत: ची आवडनिवड जपली नाही. पण माझ्या मुलांनी खूप
मोठे व्हावे, वाईट मार्गाने कधी जाऊ नये, चांगले शिक्षण घ्यावे हीच तिची अपेक्षा आहे. पण
स्वत:कडे कधी काही नसले तरी तिच्या चेहर्यावर
तिने कधीही जाणवू दिले नाही. येणार्यांची योग्य ती ऊठाबस केली. कुणाकडे हात पसरले
नाही की आपले गार्हाणे कधी कोणाला संगितले नाही. तिने आमच्यावर केलेल्या या
संस्काराबद्दल मी तिची खूप आभारी आहे. तिने आयुष्यात खूप चढउतार पाहिले. खूप कष्ट
केले पण त्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देत तिने प्रत्येक परिस्थितीत मार्ग काढला
व पुढे जात राहिली. तिने आपली सासरची व माहेरची माणसे यात कधीच फरक केला नाही.
कुणाच्याही प्रसंगात प्रत्येकाला तिच्या कुवतीप्रमाणे मदत केला. शेजारी असो, नातेवाईक असो सर्वांच्या सुखादु:खात सहभागी झाली अशी
ही माझी आई.
आपल्या मुलांनी एखादे काम केल्यावर त्यांना
कौतुकाने दाद देणारी व चांगल्या कामात
प्रोत्साहन देणारी माझी आई. तिच्याबद्दल लिहायला शब्द अपुरेच पडतील.
तिच्यामध्येअसलेला एक महत्वाचा गुण म्हणजे ती एक चांगली सुगरण आहे. तिला सर्व
प्रकारचे जेवण व इतर पदार्थ खूप छान पदार्थ करता येतात. पण स्वत: खाण्यापेक्षा
इतरांना खाऊ घालण्यात तिला फार आनंद वाटतो. सर्वजण तिच्या जेवणाची स्तुती करतात. आता तब्येतीच्या लहान मोठ्या
कुरबुरी चालू असतात पण ती कधी आजारी पडलेली किंवा झोपून राहिलेली मला आठवत नाही. अजूनही
ती जमेल तेवढे काम उत्साहाने करते अशी माझी आई तिच्याबद्दल लिहिणे म्हणजे अशक्य!
अशा माझ्या प्रेमळ माऊलीला उदंड आयुष्य लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचबरोबर या जगातील सर्व मातांना मातृ -दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.
No comments:
Post a Comment